मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबईच्या उपनगरात वेगाने मेट्रोची कामे सुरु असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ हे दोन्ही मेट्रो प्रकल्प येत्या काही महिन्यांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हे दोन्ही मेट्रो प्रकल्प वेगाने पुर्ण होत असतानाच येथील मेट्रोच्या ट्रायल रन्स देखील आता लवकरच सुरु होतील, असे सुतोवाच प्राधिकरणाने केले आहे. पश्चिम उपनगरातील या दोन्ही मेट्रो ठरल्याप्रमाणे धावू लागल्या तर निश्चितच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. कनेक्टिव्हिटी वाढेल. शिवाय प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल, असा दावा केला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांच्या उपस्थितीत नुकतेच चारकोप मेट्रो डेपो येथील नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाने मेट्रोच्या ट्रायल रन्स लवकर सुरु होतील, असे सुतोवाच केले आहे. मेट्रोच्या चाचण्या यशस्वी करण्या बरोबरच नागरिकांना सुनिश्चितच मेट्रो प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अधिकारी एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहेत. विशेषत: मेट्रो कामांचा समन्वय करण्याचे काम हे नवे कार्यालय करणार आहे. मेट्रो चाचण्यांचे संनियंत्रण करणे तसेच मेट्रो कोचच्या मेंटेनन्स शेड म्हणून देखील हे कार्यालय काम करेल.
मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु होणार आहेत. जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता एप्रिलमध्ये १० ट्रेन येतील. ट्रायल सुरु करण्यासाठी काही वेळ लागतो. किमान एक महिना यासाठीच वेळ विचारात घेतला आहे. १४ जानेवारीच्या आसपास मेट्रोच्या ट्रायल सुरु होतील, अशी शक्यता आहे.