Join us

‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:09 AM

मुंबई : ‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी आहे. त्याचा गैरवापर करू नका. पीडितेने लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांच्या आडून आपले वैयक्तिक ...

मुंबई : ‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी आहे. त्याचा गैरवापर करू नका. पीडितेने लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांच्या आडून आपले वैयक्तिक हिशेब चुकते करू नका. अन्यथा हे प्रकरण कुठे जाऊन थांबेल, याचा नेम नाही, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.

दिग्दर्शक विकास बहल यांनी २०१५ मध्ये आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिला कर्मचारीने केला आहे. या प्रकरणी बहल याचे पार्टनर व दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि मधू मंटेना यांनीही बहल यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या. या तिघांच्याही विरोधात बहल यांनी १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसान भरपाईचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी न्या. शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठापुढे होती.

महिलेच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडिता न्यायालयात हजर राहण्यास तयार नाही. हे प्रकरण पुढे नेण्यास पीडिता तयार नाही. या प्रकरणात तिला पडायची इच्छा नाही. आधीच तिने खूप मानसिक त्रास सहन केला आहे.

‘जर संबंधित महिलेलाच हे प्रकरण पुढे न्यायचे नाही, तर अन्य कोणीही याबाबत बोलू नये. या महिलेने केलेल्या आरोपांचा वापर अन्य कोणीही त्यांचे वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी करू नये. मी या चळवळीचे कौतुक करतो. मात्र, याचा कोणी गैरफायदा घेऊ नये,’ असे न्या. काथावाला यांनी म्हटले.कंपनी बरखास्तकश्यप, मोटवाने, बहल आणि निर्माता मधू मंटेना यांनी २०११ मध्ये ‘फँटम फिल्म्स’ची स्थापना केली. बहलचे नाव ‘मी टू’मध्ये आल्यावर कश्यप आणि मोटवाने यांनी कंपनी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :मीटू