माहिती अधिकाराचे म्हाडाकडून उल्लंघन

By admin | Published: August 18, 2015 03:10 AM2015-08-18T03:10:19+5:302015-08-18T03:10:19+5:30

म्हाडा कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही चूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा

MHAD violation of Right to Information | माहिती अधिकाराचे म्हाडाकडून उल्लंघन

माहिती अधिकाराचे म्हाडाकडून उल्लंघन

Next

मुंबई : म्हाडा कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही चूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याचा ठपका राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी ठेवला आहे. या प्रकरणाची म्हाडा उपाध्यक्षांनी चौकशी करुन संबंधीतांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहेत.
म्हाडा कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले ७ मे २0१५ रोजीचे चित्रण आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी म्हाडाकडे मागितले होते. त्यांनी म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडे अर्ज करत ही माहिती मागविली होती. परंतू माहिती अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीची सिडी देण्याबाबत वरिष्ठांच्या अभिप्राय मागविला. त्यामुळे अपिलकर्त्या यांनी प्रथम अपिल केले. त्यानंतर अपिलकर्त्याला माहिती देण्यात आली. परंतू आवश्यक माहिती देण्यासाठी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांनी विधी विभागाचा सल्ला मागितला. त्यामुळे अपिलकर्त्याने मुख्य माहिती आयुक्तांकडे अपिल केले. या अपिलावर झालेल्या सुनावणीत अपिलकत्याने माहिती न मिळल्याबद्दल म्हणणे मांडले.
त्यावर आदेश देताना माहिती आयुक्तांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. माहिती देण्यासाठी विधी विभागाचा अभिप्राय घेणे ही बाब मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांना न शोभणारी असल्याचे, आयुक्तांनी नमूद केले आहे. तसेच या प्रकरणात विधी विभागाचे अभिप्राय घेण्यात आले ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून त्यामुळे आयोगाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे आयोगाने नमूद केले. अपिलकर्त्यास माहिती देण्यास विलंब झाल्याने म्हाडा उपाध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करुन शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी केली आहे. तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल म्हाडा उपाध्यक्षांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत पाठवावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: MHAD violation of Right to Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.