Join us

म्हाडा : ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

By सचिन लुंगसे | Published: February 27, 2024 8:32 PM

ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा कार्यक्रमाचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास  मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज  नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा गो लाईव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापण प्रणाली म्हणजेच integrated housing lottery management system (IHLMS 2.0)  या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस २८ फेब्रुवारी रोजी  दुपारी १२ पासून सुरवात होणार आहे.  IHLMS 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण,अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तसेच सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे मोबाइल ऍप स्वरुपात देखील उपलब्ध आहे.अर्जदार अँड्रॉइड (android) फोन मध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) प्रणालीच्या  अॅप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी केले आहे.म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळांमार्फत जाहीर होणा-या सोडतींमध्ये सहभाग घेण्यासाठी IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया जरी अमर्याद उपलब्ध असली तरी छत्रपती संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक २७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. २७ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. तसेच २८ मार्च रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना  ७ एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत ऑनलाइन हरकती नोंदविता येणार आहे.  १२ एप्रिल रोजी  दुपारी ३ वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे  स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत २३३ सदनिकांचा समावेश आहे.  २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण २९८ सदनिका व ५२ भूखंड उपलब्ध असणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४१० सदनिका व ३०९ भूखंडांचा समावेश आहे.

टॅग्स :म्हाडा