म्हाडा आणि पालिकेची हातमिळवण;अनधिकृत बांधकामावरील कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:24 PM2023-07-20T13:24:46+5:302023-07-20T13:25:34+5:30

अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी उचलले पाऊल

MHADA and Municipality join hands; Action on unauthorized construction | म्हाडा आणि पालिकेची हातमिळवण;अनधिकृत बांधकामावरील कारवाई

म्हाडा आणि पालिकेची हातमिळवण;अनधिकृत बांधकामावरील कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरात उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती करताना अंतर्गत आणि बाहेरून अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, या अतिक्रमणांवर कारवाई करतेवेळी म्हाडा व पालिका या दोन प्राधिकरणांमध्ये नेहमी असमन्वय दिसून आला आहे. अनेकदा पालिकेकडे तक्रार केल्यावर ते म्हाडाच्या अखत्यारीत येते; तर म्हाडाकडे तक्रार केल्यावर ते संबंधित पालिका विभागाच्या अखत्यारीत येत असल्याची उत्तरे नागरिकांना मिळतात. यावर तोडगा काढण्यासाठी पालिका व म्हाडा प्राधिकरणाची संयुक्त पथके आता तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.           

यासंदर्भात आणखी एक बैठक काही दिवसांत होणार असून, त्याप्रमाणे सूचना पालिका व म्हाडा अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. मुंबईतील ७० ते १०० वर्षांपर्यंत आयुर्मान झालेल्या अनेक जुन्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींचा पुनर्विकास अधांतरी आहे. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात शहर व उपनगर भागांतील या उपकरप्राप्त इमारती तेथील रहिवाशांसाठी धोकादायक ठरतात.       

दरम्यान, यावर उपाय म्हणून  केल्या जाणाऱ्या डागडुजीच्या बांधकामांच्या नावाखाली अनेक अनधिकृत बांधकामे केली जात असल्याच्या तक्रारी पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे येत असतात. तशाच त्या म्हाडा प्राधिकरणाकडेही होत असतात. मात्र, बहुतांश वेळा या दोन्ही प्राधिकरणांतील असमन्वयामुळे जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलल्या जातात आणि ही अनधिकृत बांधकामे आणखी फोफावत असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. दरम्यान, या पथकाकडून तरी आता कारवाईत सातत्य राखले जाईल अशी अपेक्षा सामान्य मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

संयुक्त पद्धतीने काम केल्यास काय?

पालिकेने म्हाडाला अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याबाबत चर्चा केली असून, तक्रार असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करणाऱ्या पथकांमध्ये म्हाडाचे अधिकारी असायला हवेत, असे म्हटले आहे. कारवाई करताना दोन्ही प्राधिकरणांची पथके असल्यास सर्व गोष्टींची शहानिशा एकाच ठिकाणी होऊन निर्णय घेता येणे सहज होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. म्हाडा आणि पालिका प्राधिकरणांनी एकत्रित पद्धतीने काम केल्यास उपकरप्राप्त इमारतीतील अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही आणि ते वेळीच रोखले जाईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.

शहरात १५ उपकरप्राप्त इमारती

म्हाडा आणि मुंबई महापालिका दर वर्षी मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यंदाच्या वर्षीही म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील १५ इमारती धोकादायक आढळून आल्या आहेत. यंदाच्या धोकादायक इमारतींमध्ये गेल्या वर्षीच्या सात इमारतींचा समावेश आहे.

Web Title: MHADA and Municipality join hands; Action on unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.