मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २,१९० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी सुमारे ३० हजार जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र २ हजार १९० सदनिका असल्याने इतक्याच घरांची सोडत जाहीर करण्यात आली. विजेते ठरलेल्या अर्जदारांचे यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये ही सोडत पार पडली.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे (पुणे), सांगली, म्हाळुंगे (पुणे), करमाळा (जि. सोलापूर) येथील अत्यल्प गटातील ३७१ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाळुंगे (पुणे), सांगली येथे अत्यल्प गटातील ५८, मध्यम उत्पन्न गटातील सांगली, पिंपरी वाघिरे येथील १०० सदनिका व उच्च उत्पन्न गटातील पिंपरी वाघिरे येथील ६५ सदनिकांचा आजच्या सोडतीत समावेश होता. २० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत अल्प उत्पन्न गटासाठीच्या ७३७ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ७९२ सदनिका व कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ६७ सदनिकांचाही या सोडतीत समावेश होता. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात आले. वेबकास्टिंगच्या माध्यमातून भारतासह विविध देशांतील सुमारे १६ हजार नागरिकांनी या सोडतीचे थेट प्रक्षेपण घरबसल्या बघितले. विजेत्या अर्जदारांकरिता छायाचित्र काढण्यासाठी सोडतीच्या ठिकाणी सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आला होता. या कार्यक्रमाला पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य कुंडलिक पाटील, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या २,१९० घरांची सोडत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:48 AM