Join us

म्हाडा भवनाला मिळणार नवा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:11 AM

४० वर्षांपूर्वीची इमारत पाडणार; टोलेजंग टॉवरची उभारणी, ३०० कोटींचा खर्च अपेक्षित

- अजय परचुरे मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या म्हाडा भवनाला जर्जर झालेल्या इमारतीतून कामाचा गाडा हाकावा लागत आहे. वांद्रे पूर्वेला कलानगरजवळ असणाºया म्हाडा भवनाच्या ५ माळ्याच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय आहे. लोकांना मजबूत घरे देत असलेल्या या म्हाडा भवनाला सध्या काही ठिकाणी टेकूंचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येथे काम करणाºया हजारो कर्मचाºयांच्या सुरक्षेचा विचार करून, म्हाडाने ४० वर्षे जुन्या या मुख्य कार्यालयाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडा भवनाला साजेसा असा टोलेजंग टॉवर उभारण्यात येणार आहे.म्हाडाच्या इमारतीची अवस्था दयनीय आहे. इमारतीतील अनेक ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी स्लॅबना टेकू लावून ठेवण्यात आले आहेत. येथे दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधींचा खर्च येत आहे. म्हाडाच्या या ५ मजली इमारतीत हजारो कर्मचारी काम करतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास हजारो कर्मचाºयांना नाहक जिवास मुकावे लागेल. त्यामुळेच या इमारतीचा कायापालट होणार आहे. त्यासाठी जवळपास ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.म्हाडाच्या नव्या इमारतीचे डिझाइन कसे असेल, यावर काम सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ते म्हणाले की, सध्या आम्ही नवीन इमारत कशी असेल, किती मजल्याची असेल, तसेच वांद्रेतील कलानगर भागात म्हाडा भवन आहे. त्यामुळे नवीन म्हाडा भवनाला कसा कॉर्पोरेट लुक देता येऊ शकेल, याबद्दल आर्किटेक्टकडून वेगवेगळी डिझाइन बनवून घेत आहोत. एक आराखडा तयार करण्याचे कामही सुरू आहे. तो वरिष्ठांकडून मंजूर करून कामाला सुरुवात होईल. मात्र, नवीन म्हाडा भवन किती मजल्यांचे असेल हे आताच सांगणे कठीण आहे, पण या ठिकाणी एक मजबूत टोलेजंग टॉवर नक्कीच उभारला जाईल, असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले.आराखडा अंतिम टप्प्यातम्हाडाच्या नवीन भवनासाठी पाच वर्षे आधीच पुनर्विकास करण्याच्या कामांना वेग आला होता. यासंबंधी काम करण्यास म्हाडा अधिकाºयांनी, आर्किटेक्टने सुरुवातही केली होती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाºयांनी नीट अभ्यास करून एक प्रस्तावही तयार केला होता. मात्र, या प्रस्तावाचे पुढे काय झाले, याबाबत सरकारी यंत्रणा आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडूनही काही ठोस उत्तरे त्या वेळी मिळाली नव्हती. मात्र, आता इमारतीची झालेली दयनीय अवस्था आणि कर्मचाºयांची सुरक्षितता यांना प्राधान्यक्रम देऊन म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अधिकारी कामाला लागले आहेत. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच नवीन म्हाडा भवनाचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाºयांना आहे.

टॅग्स :म्हाडाघर