लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व बॉम्बे हौसिंग बोर्डाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हाडा प्रशासनातर्फे वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात म्हाडातील २०७ अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करीत सामाजिक दायित्व पार पाडले.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या सहकार्याने व सर जे जे महानगर रक्तपेढी, भायखळा या शासनमान्य रक्तपेढीच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले. रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी उत्पला हेगडे म्हणाल्या की, म्हाडातील २०७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे याचा फायदा थॅलेसिमिया, सिकलसेल, हिमोफेलिया आदी आजार असणाऱ्या ६२३ रुग्णांना होणार आहे. या सर्व रुग्णांना शिबिरात संकलित रक्त मोफत दिले जाणार आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन या शिबिरात करण्यात आले.