तीन वर्षांत म्हाडा पाच लाख घरे बांधणार - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:08 AM2020-01-30T04:08:08+5:302020-01-30T04:10:04+5:30
ठाण्यातील वर्तकनगर भागात ‘म्हाडा’च्या दर्शनी भागातील इमारतींचाच पुनर्विकास झाला.
मुंबई : म्हाडातर्फे तीन वर्षांत पाच लाख घरे बांधण्यात येणार असून, त्यापैकी प्रत्येकी ५० हजार घरे पोलीस कर्मचारी आणि चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
ठाणे महापालिका हद्दीत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या जमिनींबाबत आढावा तसेच ठाणे येथील शासकीय जमिनीवर सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्यासंदर्भातील बैठकीत मंत्री आव्हाड बोलत होते.
आव्हाड म्हणाले, सरकारकडे सध्या १० हजार घरांचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी १० टक्के घरे पोलिसांना आणि चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना देण्याचा निर्णय झाला आहे. येत्या दोन महिन्यांत या घरांची लॉटरी निघेल. एकूण १० हजार घरांपैकी प्रत्येकी एक-एक हजार घरे पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना उपलब्ध होतील. याशिवाय, गरिबांसाठी परवडणारी घरे सरकारसाठी वेगळी आणि विकासकासाठी वेगळी अशी न बांधता एकत्रितच बांधली जातील आणि त्यांची एकत्रित लॉटरी काढण्यात येईल, असेही आव्हाड म्हणाले.
कळवा येथे ७२ एकर, उत्तर शीव व मोघरपाडा येथे सुमारे शंभर एकर जागेवर नवीन गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री आव्हाड यांनी दिली. या वेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, म्हाडा कोकण मंडळाचे मुख्याधिकारी माधव कुसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
- ठाण्यातील वर्तकनगर भागात ‘म्हाडा’च्या दर्शनी भागातील इमारतींचाच पुनर्विकास झाला. समान न्याय या तत्त्वानुसार म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना संपूर्ण लेआउटचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येईल. याच पद्धतीने कन्नमवारनगर, टागोरनगरचा विकास केला जाईल.