घोटाळ्याप्रकरणी १२५ घरांचे वितरण म्हाडाकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 03:22 AM2019-12-28T03:22:29+5:302019-12-28T03:22:37+5:30
फेरतपासणीनंतरच लाभार्थ्यांना पुन्हा घरांचा ताबा देण्यात येणार असल्याचे
मुंबई : म्हाडाच्या मास्टरलिस्ट घर घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता म्हाडाला खडबडून जाग आली आहे. म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या आदेशात हेराफेरी करून सह मुख्य अधिकारी आविनाश गोटे यांनी मास्टरलिस्टमधील ९५ जणांच्या यादीत अधिक पाच नावे घुसवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता गोटे त्यांच्या कारकिर्दीत वितरण करण्यात आलेल्या मास्टरलिस्टवरील पूर्वीच्या १२५ घरांचे वितरण रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
फेरतपासणीनंतरच लाभार्थ्यांना पुन्हा घरांचा ताबा देण्यात येणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दशकांहून जास्त काळ मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे वितरित करण्यासाठी आॅनलाइन अर्ज मागवून मास्टरलिस्ट जाहीर करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने घेतला होता. यानुसार रहिवाशांनी आॅनलाइन अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी करून त्यांची मास्टरलिस्ट तयार केली. या संपूर्ण प्रकरणामध्ये लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय निर्माण झाल्याने गोटे यांच्या काळात पूर्वी वितरित करण्यात आलेल्या मास्टरलिस्टवरील १२५ घरांचे वितरण तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.