लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शनिवारी दहिसर पश्चिम आय. सी. कॉलनीत १ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या हस्ते झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात विविध गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तोक्ते चक्रीवादळात परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. त्या ठिकाणी यावेळी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करण्यात आले.
आज कोरोनाच्या संकटात नागरिकांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागते; परंतु आपण झाडे जगवल्यास निश्चितच आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे जनतेने यावेळी देण्यात आलेली झाडे नुसतीच लावत त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही घोसाळकर यांनी केले. यावेळी नागरिकांना कडुलिंब, फणस, आंबा, लिली व पेरूची झाडे मोफत वाटण्यात आली. यावेळी विविध गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना शाखा क्रमांक १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे.
याप्रसंगी आयसी कॉलनी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे किशोर मारवाडी, वूमन असोसिएशनच्या एव्होन डिसोझा, वेल्फेअर असोसिएशनचे दयानंद शेट्टी, रिव्हर मार्चचे संस्थापक गोपाळ झवेरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हरीश सुवर्णा, शाखाप्रमुख राजेंद्र इंदूलकर, शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसासहित कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------