मनोहर कुंभेजकर, मुंबईगोरेगावमधील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीलगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ३० टक्के डोंगरफोडीमुळे येथील परिसरात डोंगर खचून माळीणसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.डोंगरफोडीमुळे येथील ३० टक्के डोंगराची झीज झाली आहे. परिणामी डोंगरालगतच्या म्हाडा वसाहतीला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा डोंगरउतारावरील हिरवळीसह वृक्षांना आग लावण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीचे नुकसान होण्यासह मनुष्यहानी होण्याची भीती वसाहतीमधील सुनील देसाई आणि शरद मराठे यांनी व्यक्त केली आहे. डोंगरफोड थांबविण्यात यावी, यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात स्थानिक आमदार या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी स्थानिकांची भेट घेणार आहेत. डोंगराच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकाने आयटी पार्क, बँका आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये दरमहा लाखो रुपयांना भाड्याने दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येथील डोंगरफोडीमुळे आणि वृक्षतोडीमुळे म्हाडाच्या बंगल्याचे नुकसान झाले होते. परिणामी आता येथे माळीणसारखी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
म्हाडा वसाहतीला धोका !
By admin | Published: June 10, 2015 4:14 AM