मुंबई : म्हाडाने शिरढोण येथील १५ इमारतींचे मार्च महिन्याचे वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणने मार्च एंडची वसुली करताना येथील वीज पुरवठा गुरुवारी सकाळी १० वाजता खंडीत केला. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे १५ इमारतींच्या लिफ्ट सकाळपासून बंद असून, पाण्याचे पंप आणि कॉमन लाईटही बंद आहेत.
रहिवाशांना याचा मोठा मनस्ताप झाला असून, वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यावा म्हणून रहिवाशांनी महावितणसह म्हाडाला विनंती केली तरी कोणीच दाद देत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. म्हाडा इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च वेळच्यावेळी रहिवाशांकडून घेत आहे. आणि विजेचे बिल मात्र भरत नाही. याचा फटका रहिवाशांना मोठा बसला. रात्रीचे ७ वाजून गेले तरी इमारतींच्या सार्वजनिक परिसरातील वीज पुरवठा पुर्ववत झाला नव्हता. त्यामुळे अबालवृद्धांसह नागरिकांना मोठया प्रमाणावर त्रास झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.