म्हाडा : ५ हजार ३११ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 07:24 PM2023-10-16T19:24:23+5:302023-10-16T19:24:45+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.

MHADA: Extension of time till November 15 for submission of applications for 5 thousand 311 flats | म्हाडा : ५ हजार ३११ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

म्हाडा : ५ हजार ३११ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.  तसेच सोडतीतील प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेणार्‍या अर्जदारांना लवकरच स्वीकृती पत्र ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. अर्जदारांच्या सोयीकरिता मंडळातर्फे सोडतीत सहभागी होण्याकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार १५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.       

कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधामंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या नागरिकांनी PMAY योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी केलेली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा  उपलब्ध करून देण्यात आली आहे.  तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजने व्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० %  प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.               

त्याचबरोबर सोडतीतील प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेणार्‍या अर्जदारांना मंडळातर्फे लवकरच स्वीकृती पत्र ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७८ सदनीकांकरीता ४५० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी सदनिकेच्या रकमेचा भरणा केल्यानंतर लाभर्थ्यांना तातडीने सदनिकेचा ताबा देण्याचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील  विरार बोळींज प्रकल्पातील सदनिका  घेऊ इच्चिंनार्‍य अर्जदारांकरिता मंडळातर्फे उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असून अर्जदाराने उत्पन्नाचा कुठलाही पुरावा सादर करणे गरजेचे नाही. अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे आधारकार्ड व पॅन कार्ड आवश्यक असून अर्जदार विवाहित असल्यास पती व पत्नी दोघांचे आधारकार्ड, पॅन कार्ड लागणार आहे.

एक अर्जदार या प्रकल्पात एकापेक्षा अधिक स्दंनिकेकरिता अर्ज करू शकतात. या सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त (OC received) असून रेडी टू मुव्ह स्वरुपातील प्रॉपर्टी  आहे.  विक्री किंमत भरल्यावर दोन आठवड्यात ताबा दिला जाणार आहे. विस्तृत ४१ एकरवरील या प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी म्हाडाच्या ०२२ ६९४६८१०० या २४ तास कार्यरत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या योजनेतील शेवटची सदनिका विकली जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू राहील. तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेण्याकरिता  https://lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज भरावा.  सोडतीतील इतर योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.in व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अनामत रक्कम भरणा व परतावा संबंधित सुविधेकरिता इंडियन बँकेच्या ७०६६०४७२१४ व ९५२९४८५७८० या कॉल सेंटर हेल्पलाइन वर संपर्क साधावा.

Web Title: MHADA: Extension of time till November 15 for submission of applications for 5 thousand 311 flats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.