लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडा अंतर्गत मुंबईसह विविध विभागीय मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या सोडतीतील सदनिका विजेत्यांना गृहकर्ज सुलभरीत्या मिळवून देण्याकरिता म्हाडा आणि हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बुधवारी आयोजित कार्यक्रमात म्हाडातर्फे वित्त नियंत्रक विकास देसाई व एचडीएफसी लिमिटेडतर्फे सहमुख्य महाव्यस्थापक अजय सचदेव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
म्हाडाच्या सोडतीतील विजेत्या अर्जदारांना संबंधित वित्त संस्थेकडून गृहकर्ज घेणे बंधनकारक नसून गृहकर्जासाठी हा एक केवळ सुलभ पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हाडाच्या सदनिका विजेत्यांकडून गृहकर्जासाठी अर्ज करतेवेळी एचडीएफसी लिमिटेडतर्फे कोणतेही डॉक्युमेंटेशन शुल्क आकारले जाणार नाही. गृहकर्ज प्रक्रियेकरिता म्हाडाच्या सोडत विजेत्यांकडून २ हजार ५०० शुल्क आकारले जाणार आहे. ग्राहक सेवा लक्षात ठेवता म्हाडातर्फे दर तीन महिन्यांनी एचडीएफसी लिमिटेडतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला जाणार आहे.