मुंबई - पारदर्शक कार्यप्रणाली व नागरिकांची सोय या बाबी केंद्रस्थानी ठेवत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे यावर्षापासून म्हाडा सदनिका विक्री सोडत आता फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण नागरिकांना http://www.facebook.com/mhadal2017 येथे पाहता येईल.
शुक्रवारी (10 नोव्हेंबर) मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 819 सदनिकांची संगणकीय सोडत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळास यंदा 819 सदनिकांकरिता सुमारे 65 हजार अर्जदारांकडून यशस्वी प्रतिसाद मिळाला आहे. पण सोडत शुक्रवारी म्हणजे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आल्यानं अनेक अर्जदारांना रंगशारदा येथील कार्यक्रमात थेट सहभाग घेता येऊ शकणार नसल्याने सोडत सोशल मीडियाच्या फेसबुकवरुन लाईव्ह करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी दिलेत.
मुंबई मंडळातर्फे सोडतीत सहभागी होणा-या अर्जदारांच्या सोयीकरीता वेळोवेळी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. रंगशारदा नाट्यगृहातील आसन क्षमता लक्षात घेता, सोडतीत सहभागी होणा-या अर्जदारांकरिता सभागृहाखालील मोकळ्या जागेत एलईडी स्क्रिनवर नाट्यगृहातील सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल, तसंच सूचना फलकांवर देखील सोडतीचा निकाल दर्शवण्यात येईल. याव्यतिरिक्त वेब कास्टींग प्रणालीद्वारे http://mhada./ucast.in या संकेतस्थळावरुन देखील या सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अर्जदारांच्या सोयीकरीता केले जाईल. याव्यतिरिक्त संगणकीय सोडतीचा निकाल सायंकाळी 6 वाजता http://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.