मुंबई : म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर, अमरावती विभागीय मंडळांच्या वसाहतींमधील रहिवासी आणि भाडेकरूंना सेवाशुल्क ऑनलाइन भरता यावे, याकरिता निर्मित ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवेचे उद्घाटन सोमवारी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. या सेवेमुळे लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे.
ई-बिलिंग प्रणालीमुळे चार मंडळांमधील गाळेधारकांना सेवाशुल्क भरण्याकरिता ऑनलाइन पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. गाळेधारकांना लवकरच सेवाशुल्काचे बिल त्यांच्या ई-मेलवर येईल आणि संदेश मिळेल.
नवीन प्रणाली कशी आहे?
संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर विंडोअंतर्गत ही सेवा आहे. प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक तयार आहे. हा क्रमांक वापरून संकेतस्थळावर लॉग इन करावे. देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटणावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल. रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर लगेचच पोच मिळेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय तसेच गुगल पे वापरून देयक अदा करता येणार आहे.
गाळेधारकांच्या तक्रारींकरिता ई-बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापननिहाय मेलबॉक्स उपलब्ध आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. मुंबई, औरंगाबादमध्ये यापूर्वीच ई-बिलिंग प्रणाली सुरू आहे.