म्हाडाच्या दुकानांचा लिलाव आता जूनमध्ये; अनामत रक्कम अडकल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:41 AM2024-04-09T09:41:26+5:302024-04-09T09:43:07+5:30
२० मार्चला जाहीर होणारा दुकानांचा ई-लिलाव म्हाडाने थेट जून महिन्यावर ढकलला आहे.
मुंबई : २० मार्चला जाहीर होणारा दुकानांचा ई-लिलाव म्हाडाने थेट जून महिन्यावर ढकलला आहे. या निर्णयामुळे दुकानांसाठी अनामत रक्कम भरलेल्या सुमारे ३०० हून अधिक अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडाकडे अडकल्याने संताप व्यक्त केला. आचारसंहितेत लिलाव करावा की करू नये, याबाबत म्हाडामध्येच मतमतांतरे आहेत. त्यामुळे म्हाडाकडून रिस्क घेतली जात नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव सुरू होण्याची दिनांक, वेळ, बोलीसह निकालाची दिनांक वेळ म्हाडाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. ज्यांना आता या प्रक्रियेत भाग घ्यायचा नाही, त्यांना रक्कम काढता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.नोंदणीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१७३ दुकानांचा ई-लिलाव-
१) सायनमधील प्रतीक्षानगर येथील दुकाने रस्त्याऐवजी इमारतींमध्ये.
२) माझगावमधील न्यू हिंद मिल, कुर्ल्यातील स्वदेशी मिल, मुलुंड येथील गव्हाण पाडा, पवईमधील तुंगा आणि कोपरी, जोगेश्वरीमधील मजासवाडी, गोरेगाव येथील शास्त्री नगर व सिद्धार्थ नगरसह बिंबीसार नगर, मालाड मालवणी, चारकोप, बोरिवली आणि कांदिवलीत दुकाने.