नागरिकांसाठी म्हाडाचे गृह नोंदणी सर्वेक्षण मोफत

By admin | Published: December 28, 2016 03:34 AM2016-12-28T03:34:23+5:302016-12-28T03:34:23+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडातर्फे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या भागांतून घरांची आगाऊ मागणी नोंदविण्याकरिता मे ते सप्टेंबरदरम्यान म्हाडाकडून सर्वेक्षण

MHADA Home Registration Survey for Citizens Free | नागरिकांसाठी म्हाडाचे गृह नोंदणी सर्वेक्षण मोफत

नागरिकांसाठी म्हाडाचे गृह नोंदणी सर्वेक्षण मोफत

Next

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडातर्फे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या भागांतून घरांची आगाऊ मागणी नोंदविण्याकरिता मे ते सप्टेंबरदरम्यान म्हाडाकडून सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. नागरिकांच्या घरांच्या आगाऊ मागणीची नोंद घेण्याकरिता म्हाडाच्या संकेतस्थळांवर मोफत अर्ज भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आगाऊ गृह नोंदणीकरिता अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. या कामी म्हाडाने कोणत्याही संस्था, व्यक्ती, दलाल अथवा मध्यस्थ नेमलेले नाहीत. तसेच याबाबतचा अर्ज आॅनलाइन भरण्याची सुविधा असल्याने अर्जदारांची आवश्यक माहिती म्हाडाच्या सर्व्हरवर जमा आहे. काही व्यक्ती किंवा संस्था अनधिकृतरीत्या नागरिकांकडून अर्ज भरून घेत आहेत. या मार्गाने प्राप्त झालेले अर्ज म्हाडातर्फे स्वीकारण्यात येणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक होत असल्यास ही माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाला कळवावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे. फसवणूक होत असल्याची माहिती संबंधितांनी मुख्य दक्षता आणि सुरक्षा, गृह निर्माण भवन चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व येथे द्यावी, असेही आवाहन म्हाडाने केले आहे. (प्रतिनिधी)

सावध राहा
म्हाडाने राबवलेले सर्वेक्षण पूर्णत: मोफत आहे. परंतु काही संस्था प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आगाऊ गृह नोंदणीस अर्ज भरून घेण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारत आहेत. अशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Web Title: MHADA Home Registration Survey for Citizens Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.