म्हाडाचे घर मिळालेच नाही, घातला लाखो रुपयांचा गंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:59 PM2023-09-04T15:59:38+5:302023-09-04T16:00:18+5:30

बोरीवलीत म्हाडाचे घर मिळवून देण्याचे सांगत विश्वास संपादन करून ११.८५ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.

Mhada house has not been found he has lost millions of rupees | म्हाडाचे घर मिळालेच नाही, घातला लाखो रुपयांचा गंडा!

म्हाडाचे घर मिळालेच नाही, घातला लाखो रुपयांचा गंडा!

googlenewsNext

मुंबई :

बोरीवलीत म्हाडाचे घर मिळवून देण्याचे सांगत विश्वास संपादन करून ११.८५ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. आरोपींनी तक्रारदाराला तीन वेगवेगळ्या प्रकल्पात फिरवले. मात्र, घर काही मिळाले नाही. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी त्रिकुटावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

तक्रारदार शर्मिला गोहिल (४०) या दहिसर पूर्व परिसरात दोन मुलांसह राहतात. त्यांची २०१५ मध्ये दिनेश जेठवा या मित्रामुळे संजय प्रजापती, राकेश मोरे व भानू गुप्ता या आरोपींसोबत ओळख झाली. प्रजापतीची म्हाडा कार्यालयात चांगली ओळख असून, तो म्हाडाची रूम मिळवून देईल असे  त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार बोरिवलीत अशोकवनची मध्यम उत्पन्न गटातील खोली तो मिळवून देणार होता. ज्याची किंमत ही स्टॅम्प ड्यूटीसह १२ लाख ८५ हजार रुपये सांगितली, तसेच काम झाल्यावर ५ लाख रुपये कमिशन असल्याचेही त्याने नक्की केले.

गोहिलनी म्हाडाचा अर्ज भरला. त्यानंतर हे टोळके गोहिलना वांद्रेच्या म्हाडा कार्यालयात घेऊन गेले व कुलकर्णी नावाच्या व्यक्तीशी म्हाडा अधिकारी म्हणून भेट घालून देत तोच घराचे काम करणार असल्याचे त्यांना सांगितले. प्रजापतीने गोहिलकडून ३ लाख २० हजार रुपये उकळले. वेगवेगळ्या कारणांसाठी या त्रिकुटाने त्यांच्याकडून ११.८५ लाख घेतले. 

ते लेटर आमचे नाहीच... 
गोहिल यांना आरोपींनी २०१६ मध्ये त्यांच्या नावाचे म्हाडाच्या लेटरहेडवर असलेले देकार पत्र दिले. ते घेऊन म्हाडा कार्यालयात चौकशी केली तेव्हा असे पत्र आम्ही दिले नसल्याचे अधिकारी म्हणाले.

म्हाडाचा बनावट शिक्का आणि खोट्या रिसिट
आरोपींनी पैसे भरल्याच्या बनावट रिसिट दिल्या. ज्यात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई (मिळकत व्यवस्थापक) असा शिक्का आणि सही मात्र तारीख मे २००९ ची होती. जुन्या पावत्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रकल्पात रूम देणार...
खोट्या ऑफर लेटरचा प्रकार उघड झाल्याने प्रजापतीकडे पैसे परत मागितले. त्यावर शिंपोलीमध्ये म्हाडाचे तुम्हाला घर घेऊन देतो असे सांगत त्याने २ लाख घेतले. त्याचेही ताबापत्र बनावट निघाले. मग मागाठाणेत म्हाडा इमारतीमधील खोली दाखवल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. ज्यावर त्यांना बाउन्स चेक दिले गेले. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Mhada house has not been found he has lost millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.