Join us  

म्हाडाचे ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना; 'लोकमत'च्या दणक्यानंतर अनेक घरांच्या किमती कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 6:21 AM

म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किमतीवर ‘लोकमत’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता अल्प गटातील ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना मिळेल. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खासगी बिल्डरांकडून म्हाडाला लॉटरीसाठी मिळालेल्या ३७० घरांच्या किमती कमी करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती २५ टक्क्यांनी कमी होणार असून, अल्प २० टक्के, मध्यम १५ टक्के आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार आहेत, तर लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत आता १९ सप्टेंबरपर्यंत वाढविल्याचे सावे यांनी सांगितले. म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किमतीवर ‘लोकमत’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता अल्प गटातील ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना मिळेल. 

म्हाडा मुख्यालयात सावे यांच्या हस्ते बुधवारी म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचे अनावरण झाले. ते म्हणाले, आता नव्याने काढण्यात आलेल्या २ हजार ३० घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. घरांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या दहापटीने अधिक आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये विविध उत्पन्न गटातील घरांची संख्या ३७० होती. या घरांच्या किमती २५ टक्क्यांपासून १० टक्क्यापर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

३८ लाखांचे घर  २२ लाखांना-  म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यल्प गटातील घराची किंमत आता ३८ लाखांहून २२ लाख होईल, तर ४२ लाखांच्या घराची किंमत ३२ लाख होईल. यात दोन घरे आहेत. - अल्प गटातील ६२ लाखांच्या घराची किंमत ५० लाख होईल. यात २२६ घरे आहेत.- अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती अनुक्रमे २०, १५ आणि १० टक्क्यांनी कमी होतील. किमती कमी केलेल्या ३७० घरांचे सुधारित दर लवकर जाहीर केले जातील, अशी माहिती म्हाडाने दिली. उच्च गटात २४ घरे आहेत.

टॅग्स :म्हाडामुंबई