'म्हाडा'च्या घरांना ग्राहक मिळेना! आता अंदाज घेऊन घर बांधण्याचा निर्णय, ग्राहकांची मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:21 IST2025-02-13T18:17:45+5:302025-02-13T18:21:48+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या १४ हजार घरांना ग्राहक मिळत नसल्याने भविष्यात लॉटरीसाठी घरे बांधायची की नाही? या टप्प्यावर प्राधिकरण येऊन पोहोचले आहे.

'म्हाडा'च्या घरांना ग्राहक मिळेना! आता अंदाज घेऊन घर बांधण्याचा निर्णय, ग्राहकांची मागणी काय?
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या १४ हजार घरांना ग्राहक मिळत नसल्याने भविष्यात लॉटरीसाठी घरे बांधायची की नाही? या टप्प्यावर प्राधिकरण येऊन पोहोचले आहे. याचा परिपाक म्हणून ठाणे जिल्ह्यांत भविष्यात बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना नागरिकांचा प्रतिसाद मिळू शकतो, हे जाणून घेण्यासाठी म्हाडाच्या वतीने आता २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात घरांच्या मागणीचा अंदाज घेऊन प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अंबरनाथ येथील कोहोज खुंटवली व शिवगंगा नगर येथे अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांचा फिजिबिलिटी रिपोर्ट सादर करण्याआधी संभाव्य मागणीचा अंदाज घेण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी होऊन आपला अभिप्राय द्यावा, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
घर घ्यायचे, मग सहभागी व्हा!
म्हाडाकडून २८ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असून त्यात सहभागी होण्यासाठी अर्जदारांना म्हाडाच्या वेबसाइटवर जाऊन अपेक्षित माहिती भरायची आहे. ज्या ठिकाणी हे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्या ठिकाणाचे गुगल लोकेशन जाणून घेण्यासाठी क्यूआर कोडही तयार करण्यात आले आहेत.
२७ लाखांत हवे घर
मुंबई मंडळाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असून घरांच्या किती तरी पटींनी अर्ज येत आहेत. यातही म्हाडाच्या म्हाडाच्या घराच्या किमती गेल्या काही वर्षांत अव्वाच्या सव्वा वाढल्या असून घरे परवडेनाशी झाली आहेत. त्यामुळे घराची कमीत कमी किंमत २७ लाख असावी, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.
दिवाळीत सोडत?
दिवाळीत अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. गोरेगाव पहाडीपासून भांडुप, मालाड, मालवणी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला व दक्षिण मुंबईतील घरांचा यात समावेश असू शकेल.
किमती गगनाला
म्हाडाची घरे २७ ते ३४ लाखांपासून पुढे आहेत. ताडदेवमधील घरे सात कोटी, तर मालाड, घाटकोपर, बोरिवलीतील घरांच्या किमती एक ते दीड कोटींपर्यंत आहेत.
मग चला मुंबईबाहेर...
१. म्हाडाची घरे परवडत नसल्याने मुंबईकरांचा कल आता मुंबई महानगर प्रदेशाकडे वाढला आहे. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, विरारमध्ये प्रकल्पांचे काम हाती घेतली आहेत. परंतु या पायाभूत सेवा सुविधांभावी या घरांनाही अल्पप्रतिसाद मिळत आहे.
२. म्हाडाने सूर्या धरणाचे पाणी घरांना दिले असले तरी उर्वरित ठिकाणी घरांना कसा प्रतिसाद मिळेल, जेणेकरुन मुंबईकर ठाणे, विरार व अंबरनाथमध्ये घर घेऊ शकेल का याची चाचपणी म्हाडा करत आहे.