खासगी विकासकांसोबत गृहसाठा निर्माण करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे, असे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. म्हाडाकडे जमीन नाही. त्यामुळे विकासकांसोबत संयुक्त भागीदार करून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. ते म्हणाले, परवडतील अशा दरात म्हाडा घरे उपलब्ध करून देणार आहे. जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. विकासकांसोबत संयुक्त भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलब्ध केली जातील. दरम्यान, म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास यश आलेले नाही, ही खंतदेखील आव्हाड यांनी व्यक्त केली.