मुंबई - घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एक खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात १६ डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. यासाठी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
जाणून घ्या, म्हाडाच्या लॉटरीत कुठे किती घरं?
म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत आहे. म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख व त्यापेक्षा जास्त आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त आहे.
म्हाडाची मुंबईतील लॉटरी याआधी मे २०१८ मध्ये येणार होती. मात्र आधी जाहीर केलेल्या १००० घरांसाठी मुंबईमध्ये म्हाडाकडे जागाच उपलब्ध नव्हती. तसेच घरांच्या किमती वाढल्याने कोकण मंडळाच्या लॉटरीत लोकांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही ठिकाणी ही महागडी घरे लॉटरी विजेत्यांनी परतही केल्याने म्हाडावर मोठी टीका झाली होती. यापासून बोध घेत नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी घरांच्या किमती कमी करून मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांची दिवाळी भेट दिली आहे.