म्हाडा : सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:27 PM2020-07-08T13:27:10+5:302020-07-08T13:27:35+5:30
मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा; कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोंकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नाही. सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून 'म्हाडा'तर्फे दिलासा देणारा सदर निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.
कोंकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे.
म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली असून याची कृपया मुंबई व कोकण मंडळाच्या सोडतीतील संबंधित पात्र व यशस्वी लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.