म्हाडा कोकण मंडळ काढणार साडेसहा हजार घरांची लॉटरी, डिसेंंबर महिनाअखेर निघणार जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:03 AM2019-12-06T05:03:58+5:302019-12-06T05:05:04+5:30
राज्यामध्ये सरकारतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ‘सर्वांसाठी घरे’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे मुंबईनजीकच्या भागामध्ये (एमएमआर) साडेसहा हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरीसाठी जाहिरात काढण्यात येईल. म्हाडाला खासगी विकासकांकडून जी २० टक्के घरे मिळाली आहेत त्यांची किंमत ठरविण्याचे काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण होताच जाहिरात दिली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यामध्ये सरकारतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ‘सर्वांसाठी घरे’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कल्याण-शिरढोण परिसरात अडीच हजार तर खोणी येथे अडीच हजार घरे बांधण्यात येतील. या घरांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून २०२१ पर्यंत ही घरे बांधून पूर्ण करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा मानस आहे. पीएमएवायअंतर्गत सुमारे पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच २० टक्के घरे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणार आहेत. म्हाडाला खोणी, शिरढोण, ठाणे, पलावा, नवी मुंबई अशा ठिकाणी विकासकांकडून घरे मिळणार आहेत.
सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाºया पाच हजार घरांच्या योजना मंजुरीच्या प्रक्रियेचे काम म्हाडा कोकण मंडळाकडून अंतिम टप्प्यात सुरू आहे. हे काम आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर या घरांची लॉटरी काढण्यात येईल. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत म्हाडा कोकण मंडळाची ही लॉटरी जाहीर होईल, असे म्हाडाने सांगितले.
कुठे असतील घरे?
खोणी, शिरढोण, ठाणे, पलावा, नवी मुंबई