म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत; यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:03 PM2022-02-01T17:03:53+5:302022-02-01T17:15:52+5:30
MHADA News : सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ८१२ यशस्वी अर्जदारांपैकी ६२१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली आहेत.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोंकण मंडळातर्फे ऑक्टोबर-२०२१ मध्ये ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील संकेत क्रमांक २८२ ते संकेत क्रमांक ३१९ मधील पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत सादर करू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोंकण मंडळातर्फे सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांना पात्रता/अपात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी तात्काळ प्रथम सूचना पत्रे (First Intimation Letter) पाठविण्यात आली. सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ८१२ यशस्वी अर्जदारांपैकी ६२१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, १९१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा यशस्वी अर्जदारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या संपूर्ण राज्यभरात मंडळाने निर्धारित केलेल्या शाखांमध्ये आवश्यक कागदपत्रे दि. १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कोंकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कोंकण मंडळाने सन २०२१ मध्ये काढलेल्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बाळकुम- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथील २० सदनिकांचा समावेश आहे.