Join us

म्हाडा कोकण विभागीय लॉटरीची आज सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:42 AM

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९,०१८ घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होणार आहे. आॅनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५,३२४ अर्जांतून या ९,०१८ घरांच्या लॉटरीची ही सोडत आहे.

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९,०१८ घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होणार आहे. आॅनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५,३२४ अर्जांतून या ९,०१८ घरांच्या लॉटरीची ही सोडत आहे. म्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी १० वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या लॉटरीचा शुभारंभ होईल.

सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच निकाल जाणून घेता येईल. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लॉटरीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात येणार असून भवनात होणाऱ्या संगणकीय लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे याकरिता एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत. म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडा मुख्यालयात २७ आॅगस्ट ते ०१ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर राहावे, असे आवाहनही म्हाडातर्फे करण्यात आले आहे. सोडतीमधील विजेत्या तसेच प्रतीक्षाधीन अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर २५ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाईल. आॅनलाइन नोंदणीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण विभागाची ही लॉटरी याआधीच चर्चेत आहे. लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे म्हाडाला आॅनलाइन नोंदणीसाठी अजून मुदत वाढवावी लागली होती. मुदत वाढवूनही हा आकडा ५५,३२४ अर्जांपर्यंतच पोहोचू शकला आहे.अशी आहेत उपलब्ध घरेयंदाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ५१८ सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण) येथील ३,९३७ अशा एकूण ४,४५५ सदनिकांचा समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४,३४१ सदनिकांचा समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई