Join us

म्हाडा लॉटरी! ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १,२०,१४४ अर्जांचा सहभाग

By सचिन लुंगसे | Published: July 28, 2023 6:37 PM

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे.

मुंबई: म्हाडाच्यामुंबई  गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन, येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२  सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त झालेल्या १,४५,८४९ अर्जांपैकी  अंतिमतः १,२०,१४४  अर्ज संगणकीय सोडतीत  सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून मंडळाकडे अंदाजे रु ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार  आहे. 

मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणार्यां पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in  या संकेतस्थळावर २८ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वा प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दिनांक २२ मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीला उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. ११ जुलै, २०२३ या सोडत प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये १,४५,८४९ अर्ज प्राप्त झाले होते व १,२२,३१९  अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती २१७५  अर्ज नानाविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा तपशील मंडळातर्फे सकारण म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे  असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातिल ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५)  या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२  अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(४१६) या योजनेकरिता आहेत आहेत तर  मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी  ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.

टॅग्स :मुंबईम्हाडा