म्हाडा काढणार १६ हजार घरांची लॉटरी; जाहिरात आचारसंहितेपूर्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:28 AM2019-02-14T05:28:36+5:302019-02-14T05:28:46+5:30
घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडा तब्बल सोळा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसह कोकणात ही घरे असणार आहेत.
मुंबई : घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडा तब्बल सोळा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसह कोकणात ही घरे असणार आहेत. या संदर्भातील जाहिरात म्हाडाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून, निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया राबविली जाईल.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भात अधिक माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे ६ हजार ८०२ घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या मुंबई मंडळाला हाउसिंग कोट्यातून मिळालेल्या २३८ घरांची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढली जाणार आहे, शिवाय म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ६६४ घरांचा समावेशही लॉटरीत करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील ९१७ तर नाशिक येथील १ हजार १८३ घरांचा लॉटरीत समावेश असणार आहे.
मागील वर्षी कोकण मंडळातर्फे सोडत काढण्यात आली होती. यात विरार येथील घरांचा समावेश होता. म्हाडाच्या बैठकीत प्राधिकरणातील २ हजार ४५७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मंडळांतर्गत नऊ हजार घरांची लॉटरी काढली जाईल.
कल्याण गोठेघरमधील २ हजार ४५५ आणि भंडारलीमधील १ हजार ७४३ घरे ही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आहेत.
ठाणे येथील मानपाडा, चितळघर येथील १ हजार १५० घरांची लॉटरी काढली जाईल. नैना प्रकल्पांतर्गतही घरे उभारण्यात येणार आहेत.
पवई तुंगा येथील घरांच्या किमती कमी करण्याबाबत विचार केला जात आहे, असेही म्हाडाकडून सांगण्यात आले.
चेंबूर येथील सहकार नगरमधील अल्प उत्पन गटातील १७० घरे, पवईमधील मध्यम उत्पन्न गटातील ४६ घरांचा यात समावेश आहे.
अंधेरीतल्या जेव्हीपीडी योजनेतील १७ घरे, ताडदेव येथील एक घर आणि वरळी येथील ४ घरांचा समावेश लॉटरीत आहे.
प्रतीक्षानगर, मुलुंड, कुर्ला, कांदिवली-चारकोप येथे १०८ व्यवसायिक गाळे.