Join us

म्हाडा लॉटरी : ४०८२ घरे आणि १.४५ लाख अर्ज; १.१९ लाख अर्जदारांनी अनामत रक्कम भरली

By सचिन लुंगसे | Published: July 11, 2023 7:06 PM

 मुंबई मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून  १,४५,८४९ अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत यापैकी  १,१९,२७८  अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे.  मुंबई मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो.

मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत ११ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता संपुष्टात आली आहे परंतु अर्जदार अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा रात्री ११.५९ पर्यन्त करू शकणार आहेत. तसेच RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार दि. १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतील.  दि. १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत ४०८२ सदनिकांच्या विक्रीसाठी  दि. २२, मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका तसेच अॅअन्टॉप हिल व विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटकरिता पहाडी  गोरेगाव, लोकमान्य नगर दादर,   अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली,  जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत.

तसेच उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथील गृहप्रकल्पांतरगत मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांचा समावेश आहे.   उच्च उत्पन्न मध्ये जुहू - अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथील सदनिकांचा समावेश आहे. 

११ जुलै रोजी संध्याकाळी अर्ज सादर करण्याची लिंक संपुष्टात येईपर्यंत संगणकीय  सोडत प्रणालीमध्ये उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांकरीता ३५,२३१ अर्ज प्राप्त झाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांकरीता ७३,४१४ अर्ज प्राप्त झाले आहेत, मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांकरीता १०,५०० अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी  २९२८  अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत १९४७ सदनिकांसाठी २३७७६ अर्ज प्राप्त झाले आहेत.   

सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई