मुंबई : म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोकण मंडळाच्या जवळपास अडीच हजार घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांची सोडत रविवारी काढली गेली, त्या वेळी कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली.
बाळासाहेब पाटील म्हणाले की, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नगर, नाशिक, नागपूर, पुणे अशा शहरी भागांमध्ये जिथे चांगल्या मूलभूत सुविधा आहेत, तिथे सर्वसामान्यांना घर मिळावे, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.
येत्या ऑगस्टमध्ये ठाणे आणि ठाण्याच्या परिसरामधील सुमारे अडीच हजार घरांची सोडत आम्ही काढणार आहोत, तसेच कोकण विभागामध्ये सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे बनविण्याचे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. याच वेळी गिरणी कामगारांसाठी जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा आॅगस्टमध्ये ३,८०० घरांची सोडत काढणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. लोअर परळ सेनापती बापट मार्ग येथील श्रीनिवास मिल आणि वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल या दोन्ही मिलच्या जागांवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या रविवारी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटातील सहकारनगर, चेंबूर येथील १७० सदनिका आणि मध्यम उत्पन्न गटातील ४७ सदनिकांची सोडत काढण्यात आली.१ लाख ६३ हजार गिरणी कामगार घरांपासून वंचितम्हाडाच्या घरांच्या लॉटरीच्या कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी ३,८०० घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र प्रत्यक्षात अर्ज करणाऱ्या १ लाख ७५ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांपैकी अद्याप १ लाख ६३ हजार गिरणी कामगार घराच्या स्वप्नापासून अद्याप वंचित असल्याचे उघड झाले आहे.
लॉटरीदरम्यान, उदय सामंत म्हणाले की, गिरणी कामगारांसाठी जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा आॅगस्टमध्ये ३,८०० घरांची सोडत काढली जाणार आहे. लोअर परळ सेनापती बापट मार्ग येथील श्रीनिवास मिल आणि वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल या दोन्ही मिलच्या जागांवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. पण प्रत्यक्षात १ लाख ७५ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील १२ हजार कामगारांना घरे लॉटरीमध्ये जाहीर झाली. त्यातील बहुतांश जणांची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने, त्यांना या घरांचा ताबा अद्याप मिळालेला नाही. म्हाडाने २०१२ साली ६,९७५ घरांची लॉटरी काढली होती. मात्र, अद्याप या लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर, २०१६ साली सहा गिरण्यांच्या जागेवरील २,४३६ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. यानंतर, त्याच साली एमएमआरडीएच्या २,४१८ घरांची लॉटरी काढण्यात आली. यामुळे अद्याप १ लाख ६३ हजार गिरणी कामगार घराच्या स्वप्नापासून अद्याप वंचित आहेत.