लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने लवकरच दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असतानाच, कोकण मंडळानेही लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे. लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव केली जात असून, याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे. कोकण मंडळाकडे सुमारे ९ हजार घरे असून, यात आणखी काही घरांची वाढ होऊ शकते, अशी माहिती कोकण मंडळाच्या सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांना देकार पत्र देतेवेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी मुंबई मंडळाची दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आता कोकण मंडळाच्या घरांच्या लॉटरीकडे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी लॉटरी काढण्याचा प्रयत्न मंडळांकडून सुरू आहे. यामध्ये मुंबई मंडळ, कोकण मंडळ आणि पुणे मंडळांचा समावेश आहे.
३ हजारांहून अधिक घरे
मंडळाकडे नवीन ३ हजारांहून अधिक घरे आहेत. यामध्ये २० टक्के योजनेतील सुमारे ९००, पंतप्रधान आवास योजनेतील दीड हजारांहून अधिक आणि म्हाडा योजनेतील घरांचा समावेश आहे. तसेच यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विक्री न झालेल्या ४ हजारांहून अधिक घरांचा यामध्ये समावेश आहे.
लवकरच जाहिरात
मुंबई मंडळामार्फत काही दिवसांत लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर कोकण मंडळानेही विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.