Join us

म्हाडा लॉटरी : १६९ विजेत्या अर्जदारांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

By सचिन लुंगसे | Published: August 30, 2023 6:53 PM

या अर्जदारांकडून १ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यास त्यांचा नकार ग्राह्य धरून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती आज मंडळातर्फे कळविण्यात आली आहे. 

मुंबई :म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील स्वीकृती पत्र सादर न केलेल्या १६९ यशस्वी अर्जदारांना सदनिका स्वीकृतीबाबत निर्णय मंडळास कळविण्याकरिता दोन दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत आहे. या अर्जदारांकडून १ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यास त्यांचा नकार ग्राह्य धरून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती आज मंडळातर्फे कळविण्यात आली आहे. 

१४ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका विक्रीची सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे कार्यान्वित झाली.  या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची पूर्तता करणारे पात्र ठरलेले अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले. मंडळाच्या सोडत नियमावलीनुसार सोडतीतील विजेत्या अर्जदारांना त्यांना मिळालेली सदनिका ते घेत असल्याबाबतची स्वीकृती दर्शविण्याकरीता प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. ४०८२ यशस्वी अर्जदारांपैकी ३४६२ अर्जदारांची स्वीकृती प्राप्त झाली  आहे. स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी अर्थात घर स्वीकारणार की मंडळास परत करणार याबाबत पर्याय निवडण्याकरिता यशस्वी अर्जदारांना दि. २७ ऑगस्ट, २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, १६९ अर्जदारांनी मंडळास अद्यापपर्यंत स्वीकृती कळविलेली नाही. अशा अर्जदारांना एक संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदत कालावधीत यशस्वी अर्जदारांकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना संधी देऊन त्यांना स्वीकृती पत्र पाठविण्यात येईल. 

सोडतीतील ४०८२ सदनिकांपैकी ३४६२ यशस्वी अर्जदारांचे स्वीकृती पत्र मंडळास प्राप्त झाले आहेत. ७७ विजेत्या अर्जदारांनी  उत्पन्नाबाबत आक्षेपार्ह माहिती सादर केल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असल्याने या अर्जांवरील कार्यवाही प्रलंबित आहे. ३७० अर्जदारांनी त्यांना सोडतीत प्राप्त झालेली सदनिका मंडळाला परत करण्याबाबतचा निर्णय कळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक सदनिका मिळाल्या आहेत, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.  

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑगस्ट, २०२३ रोजी जाहीर करण्यात आली. सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश होता. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे  असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ 

सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५)  या योजनेकरिता प्राप्त झाले. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२अर्ज प्राप्त झाले. या उत्पन्न गटात सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (४१६) या योजनेकरिता प्राप्त झाले. तर  मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले. या उत्पन्न गटात सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले. उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता प्राप्त झाले.

टॅग्स :म्हाडा