मुंबई : कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीच्या सुधारित वेळापत्रकानुसार सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी आता दि. ९ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती दाखल करणे, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी याबाबतच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ७ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे. प्रारुप यादीची प्रसिद्धी झाल्यापासून दावे-हरकती ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ९ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली.
संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.