म्हाडा लॉटरी: दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश, १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र  

By सचिन लुंगसे | Published: November 9, 2023 07:00 PM2023-11-09T19:00:05+5:302023-11-09T19:00:21+5:30

MHADA Lottery: म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा यशस्वी पात्र अर्जदारांना ताबा पत्र देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे १५० पात्र यशस्वी अर्जदारांना ताबा पत्र देण्यात आले आहे.

MHADA Lottery: Home Admission on Diwali, Online Possession Letter to 150 Successful Eligible Applicants | म्हाडा लॉटरी: दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश, १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र  

म्हाडा लॉटरी: दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश, १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र  

मुंबई - घर विजेत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करता यावा, याकरिता म्हाडातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीतील यशस्वी पात्र अर्जदारांपैकी १०० टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत; आणि म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा यशस्वी पात्र अर्जदारांना ताबा पत्र देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे १५० पात्र यशस्वी अर्जदारांना ताबा पत्र देण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑगस्ट रोजी नवीन संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात आली. या नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले.

मंडळातर्फे सोडत पश्चात प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली असून यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविणे, तात्पुरते देकार पत्र पाठविणे, अर्जदाराने २५ टक्के विक्री किंमतीचा भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, वितरण आदेश देणे (मुद्रांक शुल्काचा भरणा करणे, दस्त नोंदवणे), ताबा पत्र देणे, ताबा पत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या सर्व प्रक्रिया प्रणालीमार्फत ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.

या सर्व प्रक्रियेत सर्व पत्र संबंधित अर्जदारांना संबंधित अधिकार्‍यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. यामुळे बनावट, खोटी कागदपत्र बनविणार्‍यांना चाप बसणार आहे. या सर्व पत्रांवर क्यु आर कोड टाकण्यात आला असून क्यू आर कोडद्वारे या कागदपत्रांची सत्यता क्षणार्धात तपासता येणार आहे. क्यू आर कोडमुळे  कागदपत्रांची दुय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार देखील टाळता येणार आहेत.

अद्यापपर्यंत सोडतीतील पात्र ठरलेल्या यशस्वी अर्जदारांपैकी सुमारे ५५० अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किंमतीचा १०० टक्के भरणा मंडळाकडे केला आहे. यामधील १५० पात्र अर्जदारांनी प्राप्त सदनिकेची १०० टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत व म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा अर्जदारांना ताबा पत्र देण्याची प्रक्रिया मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे.

मात्र, काही अर्जदारांनी सदनिकेची रक्कम जरी पूर्ण भरलेली असली तरी त्यांनी सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कलाकार असल्याचे प्रमाणपत्र सादर करणार या अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज केले होते व ते ही कागदपत्र सादर करू शकलेले नाहीत, अशा अर्जदारांना सदनिकेचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

सोडतीतील यशस्वी अर्जदारांना वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मंडळातर्फे आजतागायत सुमारे १४११ ना-हरकत प्रमाणपत्र अर्जदारांनी मागणी केल्यानुसार २४ तासांच्या आत ऑनलाइन वितरित करण्यात आले आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांना सदनिकेचा ताबा लवकर मिळावा यासाठी मंडळाच्या उपमुख्य अधिकारी पणन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत वाढीव काम करीत आहेत.

Web Title: MHADA Lottery: Home Admission on Diwali, Online Possession Letter to 150 Successful Eligible Applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.