लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर नऊ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमधील घरांच्या किमती १६ लाखांपासून ४० लाखांपर्यंत असणार. म्हाडाचे कोकण मंडळ ही लॉटरी काढणार असून, याबाबतची जाहिरातदेखील लवकरच प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, आता कोकण मंडळाची लॉटरी निघत असतानाच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सूत्रांच्या म्हणण्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये चार हजार घरे असणार असून, यातील ३ हजार ५०० घरे गोरेगाव पहाडी या परिसरात असणार आहेत. मात्र, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत अद्याप सुस्पष्टता नसल्याने या लॉटरीसाठी वाटच पाहावी लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून दरवर्षी घरांची लॉटरी निघते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. त्यातल्या त्यात कोकण मंडळाकडून घराच्या लॉटरीची आशा होती. मात्र, अनेक दिवस याबाबत हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे चित्र होते. मात्र, आता म्हाडाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे २०, कासारवडवली ३५० घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत १६ लाखांच्या आसपास असेल. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी ६७ घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट आहे. या घराची किंमत ३८ ते ४० लाखांच्या आसपास असेल. कल्याणमध्ये दोन हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटाकरिता असून, या घराची किंमत १६ लाख असेल, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
विरारमध्ये १३००, तर गोठेघरमध्ये १२०० घरे
विरार येथे १ हजार ३०० घरे असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील. मिरा रोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी घरे असून, ही घरे १९६ असतील. ही घरे एक ते दोन बीएचके असतील. ठाण्यातील गोठेघर येथे तीनशे चौरस फुटांचे एक हजार दोनशे घरे असणार असून, अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली ही घरे १७ लाख रुपयांची असतील.