म्हाडा - गिरणी कामगारांना लागणार घरांची लॉटरी
By सचिन लुंगसे | Published: February 14, 2024 12:54 AM2024-02-14T00:54:12+5:302024-02-14T00:54:24+5:30
मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी कोन (ता. पनवेल, जि. रायगड) येथील २४१७ घरांच्या काढलेल्या लॉटरीमधील यशस्वी पात्र व संपूर्ण ...
मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी कोन (ता. पनवेल, जि. रायगड) येथील २४१७ घरांच्या काढलेल्या लॉटरीमधील यशस्वी पात्र व संपूर्ण किंमत भरलेल्या सुमारे ५८५ गिरणी कामगार / वारस यांना घरांची चावी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे दिली जाणार आहे.
शासनाकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडेतत्वावरील घरे योजनेतील उर्वरित राहिलेली घरे गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने गिरणी कामगारांकरिता कोन येथील २४१७ घरांची लॉटरी २ डिसेंबर २०१६ रोजी काढण्यात आली.
एमएमआरडीएतर्फे बांधलेली प्रत्येकी १६० चौरस फुटाची दोन घरे एकत्र करून ३२० चौरस फुट चटई क्षेत्रफळ आकारमानाची घरे गिरणी कामगार / वारस यांना मिळणार आहेत. कोरोना काळात ही घरे संबंधित महापालिकेने ताब्यात घेऊन प्रशासकीय कारणास्तव त्याचा वापर केल्यामुळे या घरांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या घरांच्या दुरूस्तीचे म्हाडाने पुढाकार घेऊन सुरू केलेले काम पूर्ण झाले आहे.
गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.