म्हाडाचे घर कोणाला लागणार? आज सोडत; ४,०८२ घरांसाठी सव्वा लाख अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 06:26 AM2023-08-14T06:26:58+5:302023-08-14T06:27:13+5:30
४ हजार ८२ घरांसाठी सोडत प्रक्रियेमध्ये एकूण १,२०,२४४ अर्जांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात घरांची लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.
म्हाडाच्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता अर्जदारांना निकाल पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा असून, वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने आहे. विजेत्या अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध होईल. ४ हजार ८२ घरांसाठी सोडत प्रक्रियेमध्ये एकूण १,२०,२४४ अर्जांचा समावेश आहे.