मुंबई : म्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली , बोरीवली , विक्रोळी , घाटकोपर , पवई , ताडदेव , सायन , येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीची संगणकीय सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंडळातर्फे अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनामत रक्कमेचा भरणा केलेल्या १,२२,२३५ अर्जांचा समावेश आहे, यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर १४,९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १,०६,७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहेत.
आज दुपारी सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या ५२७ अर्जदारांना दि. १९ जुलै ,२०२३ दुपारी ०३.०० पर्यंत म्हाडाच्या संकेत स्थळावर लॉगिन करून 'My Issue' या मेनू मध्ये जाऊन 'Raise Grievance' हा पर्याय वापरुन हरकती-दावे ऑनलाइन नोंदविता येणार आहेत. यामध्यमातून त्यांना १९ जुलै, २०२३ रोजीपर्यंत पात्रता निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.तसेच छाननी प्रक्रियेत असलेल्या १४,९९० अर्जांची यादी दि. १९.७.२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अर्जदारांना देखील २१ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत हरकती अथवा दावे सादर करून पात्रता निश्चिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सोडतीसाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची अंतिम यादी दि. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजता म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १,०६, ७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत पात्र ठरले आहेत.
२२ मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीला उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. ११ जुलै, २०२३ पर्यन्त संगणकीय सोडत प्रणालीमध्ये १,४५,८४९ अर्ज प्राप्त झाले होते व १,१९,२७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे तर १७९५ सदनिका म्हाडा योजनेतील आहेत तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत १३९ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या ७५ सदनिका , विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत २५ सदनिका तर १०२ विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०, अल्प उत्पन्न गटासाठी १०३४, मध्यम उत्पन्न गटासाठी १३९ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनातर्फे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे. सोडतीत विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत प्राप्त सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका, मुंबई मंडळांतर्गत विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे.