मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमधे सहभाग घेणार्या अर्जदारांच्या सोयीकरिता २४ तासांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार मंडळातर्फे अर्ज सादर करण्यासाठी मंडळातर्फे उपलब्ध करवून देण्यात आलेली लिंक उद्या दिनांक ११ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजे पर्यंतच कार्यरत राहील तसेच अर्जदारांना अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा उद्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे.
मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. तसेच दि. १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. दि. १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई मंडळाच्या सोडत प्रणाली मध्ये अर्जदारांनी सादर केलेले १५ वर्ष वास्तव्याचे अधिनिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यांची पडताळणी 'महाऑनलाइन' या सरकारी संकेत स्थळावरून केली जाते. मात्र रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सोमवार दिनांक १० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कार्यरत नसल्यामुळे मुंबई मंडळाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेणार्या इच्छुक अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही . करिता मंडळातर्फे २४ तासांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.
दि. २२, मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून अर्जदारांचा सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे तर १७९५ सदनिका म्हाडा योजनेतील आहेत तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत १३९ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या ७५ सदनिका , विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत २५ सदनिका तर १०२ विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०, अल्प उत्पन्न गटासाठी १०३४, मध्यम उत्पन्न गटासाठी १३९ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपयापर्यंत आवश्यक आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही. उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे. सोडतीत विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत प्राप्त सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका, मुंबई मंडळांतर्गत विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे.
सदनिका विक्रीकरिता मंडळाकडे निश्चित साचेबद्ध कार्यप्रणाली कार्यरत आहे. मंडळाने सदनिकांच्या विक्री करिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतींनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टी एजंट / मध्यस्थ/ दलाल म्हणून नेमलेले नाही अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. नागरिकांना असेही आवाहन करण्यात येत आहे की त्यांची अशाप्रकारे कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे.
अर्जदारांनी सोडतीविषयक सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.