मुंबई : भाडेपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तींनुसार चारकोप येथील भूखंड तात्काळ या परिसरातील मुले आणि रहिवाशांसाठी खुला करावा अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पत्र म्हाडाने विद्या शिक्षण प्रसारक मंडळाला पाठवले आहे.विद्या शिक्षण प्रसारक मंडळाने २७ आॅक्टोबर २00५ रोजी झालेल्या करारानुसार म्हाडाकडून चारकोप येथील भूखंड क्रमांक १, आरएससी - १२, सेक्टर - ३ हा भूखंड म्हाडाकडून वार्षिक एक रूपया करारावर घेतला आहे. एकूण ४९३६.२९ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या भूखंडाचा ताबा या शिक्षण संस्थेने घेतला. त्यातील शाळेच्या इमारतीसाठी २२५१.0६ चौ.मी. तर खेळाच्या मैदानासाठी २६८५.२३ चौ.मी. देण्यात आला आहे.भाडेपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तीमधील अनुक्रमांक ड मध्ये खेळाच्या मैदानासाठी २६८५.२३ चौ.मी.चा भूखंड मुलांसाठी आणि चारकोप कांदिवलीतील रहिवाशांसाठी खुला ठेवण्यात यावा, असे नमूद आहे. मात्र संस्थेने या मैदानाचा पूर्णत: कब्जा करून येथील स्थानिक रहिवाशांना आणि मुलांना या मैदानाचा वापर करण्यास मनाई केल्याची तक्रार युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अॅन्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी म्हाडाकडे केली. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी संस्थेला हे पत्र पाठवले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण संस्थेला म्हाडाची नोटीस
By admin | Published: March 28, 2016 2:45 AM