दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:17 IST2025-04-16T13:16:35+5:302025-04-16T13:17:50+5:30
Mumbai Mhada News: कोकण मंडळाच्या लॉटरीत ठाणे येथील सदनिका मोहम्मद खान मिळाली होती. मात्र घराची विक्री किंमत भरताना विलंब केल्याने बिल्डरने आकारलेले व्याज माफ करण्याबाबत खान यांनी म्हाडामध्ये अर्ज केला होता.

दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना
मुंबई : घरांची कामे पूर्ण करण्यासाठी किंवा लॉटरीत घर लागल्यानंतर घरात प्रवेश मिळेपर्यंत यशस्वी अर्जदारांना म्हाडाच्या शंभर वेळा पायऱ्या चढाव्या लागतात. हे लक्षात घेऊन म्हाडामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मंगळवारी झालेल्या लोकशाही दिनात कोकण मंडळाच्या लॉटरीमधील २० टक्के सर्वसमावेशक योजनेचे यशस्वी अर्जदार मोहम्मद खान यांचे १ लाख ७० हजार रुपयांचे व्याज माफ करण्याचा निकाल देण्यात आला.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात १० अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
कोकण मंडळाच्या लॉटरीत ठाणे येथील सदनिका मोहम्मद खान मिळाली होती. मात्र घराची विक्री किंमत भरताना विलंब केल्याने बिल्डरने आकारलेले व्याज माफ करण्याबाबत खान यांनी म्हाडामध्ये अर्ज केला होता. यावर जयस्वाल यांनी खान यांचे १ लाख ७० हजार रुपयांचे व्याज माफ करण्याचे आदेश संबंधित बिल्डरला दिले.
गिल्बर्ट झेवियर यांच्या भावाने अंधेरी पूर्वेकडील पीएमजीपी कॉलनी येथील घर बक्षीसपत्राद्वारे झेवियर यांच्या नावे केले होते. मात्र, मुद्रांक शुल्क भरून घर हस्तांतरण झाले नसल्याने त्याबाबत झेवियर यांनी अर्ज केला. तेव्हा विशेष बाब म्हणून घर तत्काळ गिल्बर्ट झेवियर यांच्या नावे शुल्क आकारून हस्तांतरित करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले.
लोकशाही दिनामध्ये तक्रार नाही सुटली तरी तक्रारदार निराश होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बनावट पुराव्यांप्रकरणी १५ दिवसांत निकाल द्या!
अंधेरी-जुहू लेन येथील नवभारत सहकारी संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत खोटी शपथपत्र व बनावट पुरावे सादर करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा अर्ज फारुक शेख यांनी केला होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत तपास करून ३० एप्रिलपूर्वी निकाल द्यावा, अशी सूचनाही उपाध्यक्षांनी केली.
पर्याय सुचविण्यासाठी उपाध्यक्षांचा पुढाकार
घरांच्या लॉटरीपासून पुनर्विकासापर्यंतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हाडाने काही वर्षांपासून लोकशाही दिनाची संकल्पना मांडली आहे. अधिकाऱ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय सुचविण्याकरिता आता स्वत: उपाध्यक्ष लक्ष घालत आहेत.
कामगार आयुक्तांना पत्र
गिरणी कामगार विठ्ठलदास खेडेकर यांनी पात्रता निश्चितीसाठी सादर केलेला ऑनलाइन अर्ज कागदपत्रांमधील त्रुटींमळे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविला होता.
मात्र, प्राधिकृत व अपील अधिकारी यांनी मागितलेली कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याची सुविधा नसल्याने खेडेकर यांनी ही कागदपत्रे सादर करून घ्यावी आणि पात्रतेची संधी मिळावी यासाठी अर्ज केला.
याप्रकरणी कामगार उपायुक्तांना पात्रता निश्चितीप्रकरणी १५ दिवसांत निर्णय घेण्याचे पत्र देण्याबाबत अधिकाऱ्याना निर्देश देण्यात आले.
समस्या निवारणावर भर द्या
लोकशाही दिनी होणाऱ्या तक्रार निवारणाव्यतिरिक्त म्हाडाचे मुंबई मंडळ, दुरुस्ती मंडळ किंवा संजीव जयस्वाल यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ज्या अधिकाऱ्यांकडे विषय आहे त्यांनी प्राधान्याने सोडवाव्यात, अशा कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.