मुंबई : म्हाडाकडे सध्या जमीन उपलब्ध नसल्याने मुंबईकरांना म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यामध्ये म्हाडा अपयशी ठरू लागली आहे. यामुळे खाजगी जमीन मालकांची जमीन घेऊन तसेच ना विकास क्षेत्रात नॅनो घरे बांधून मुंबईसह राज्यातील नागरिकांना म्हाडामार्फत स्वस्तातील घरे देण्याचा विचार सुरू असून तशा सूचना म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबईमध्ये जागेच्या किंमती अव्वाच्यासव्वा असल्याने खाजगी विकासकांना निर्माण केलेल्या इमारतीमध्ये आपले हक्काचे घर घेणे हे सामान्य मुंबईकरांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो मुंबईकरांना म्हाडाच्या सोडतीची वाट पहावी लागत आहे, परंतु म्हाडाकडे स्वत:ची फारशी जमीन उपलब्ध नसल्याने इथेही अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई तसेच राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी जमीन आणि ना विकास क्षेत्रातील जमिनीवर घरे बांधण्याचा शासन विचार करत असून त्यासाठी संबंधित खात्याकडून सर्व परवानग्या मिळवल्यानंतरच परवडणारी घरे उभी राहतील असे आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या किंमती साधारणत: तीन ते चार लाख रूपयांपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.