मुंबई - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. म्हाडा (MHADA) आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार असल्याची माहिती दिली आहे. "कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे. मुंबई शहरामध्ये 4 ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील. त्याच्यातील पहिल्या वसतिगृहाची सुरुवात काळाचौकी, जिजामाता नगर येथे करण्यात येईल" अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की, मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी म्हणून विकासकाने तिथल्या रहिवाशांबरोबर समझोता करार केला आहे. पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास न-करता तसेच रहिवाशांना भाडे न-देता मुजोरपणाची वागणूक हे विकासक करीत आहेत. यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकासकाने इमारतीचे काम रोखून ठेवले. तर म्हाडाला ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा" असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.