मुंबई - म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या २०३० घरांपैकी बिल्डरकडून मिळालेल्या घरांच्या किमती कमी करण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यानुसार म्हाडाने या घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांनी कमी केल्या असून, त्यांची नवी यादी वेबसाईटवर टाकली आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या अर्जांमध्ये किती वाढ होते? याबद्दल उत्सुकता आहे.
मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर असलेल्या म्हाडाच्या घरांच्या किमतीबद्दल ‘लोकमत’ने यापूर्वी वेळोवेळी वृत्त दिले होते. म्हाडाला जमीन मोफत मिळते, मग घरे खासगी बिल्डरांपेक्षा महाग कशी, असा प्रश्न ‘लोकमत’ने वारंवार उपस्थित केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. यामध्ये बिल्डरांकडून मिळालेल्या घरांचा सध्या विचार करण्यात आला आहे.
किमती घटवलेली घरे ३७०अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती यापूर्वीच २५ टक्क्यांनी घटवल्या आहेत. आता अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती १० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. बिल्डरकडून म्हाडाला मिळालेली एकूण ३७० घरे असून, त्यावर ही सवलत मिळणार आहे.