समतानगरातील पुनर्विकासात म्हाडा रहिवाशांना मिळाली घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:24 AM2018-04-09T02:24:45+5:302018-04-09T02:24:45+5:30
कांदिवली (पूर्व) येथील समतानगरातील ५२ एकर भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील २00 गाळ्यांच्या रहिवाशांना रविवारी चाव्या देण्यात आल्या.
मुंबई : कांदिवली (पूर्व) येथील समतानगरातील ५२ एकर भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील २00 गाळ्यांच्या रहिवाशांना रविवारी चाव्या देण्यात आल्या. दहा हजार रहिवाशांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
समतानगर फेडरेशनने १९९८ साली नेमणूक केलेल्या विकासकाने दहा वर्षांत २00 रहिवाशांची घरे रिकामी करून त्यांना भाड्याने राहण्यास पाठवले होते. मात्र त्या विकासकाने एकाही रहिवासी कुटुंबाला घर न देता २00 घरे बांधून बाहेरील लोकांना विकली. त्यामुळे फेडरेशनने २00७ साली त्या विकासकाला काढून शापुरजी पालनजी आणि एस. डी. कॉर्पोरेशनची नेमणूक केली. त्यांना एकत्रित पुनर्विकास करण्यास २00८ मध्ये सरकारने मंजुरी दिली.
टप्प्याटप्पाने येथील बाराशे रहिवाशांना घरे देण्यात येणार आहेत. त्यातील २00 जणांना दिलीप ठक्कर आणि अमित ठक्कर यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. या रहिवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. पुढील टप्प्यात मार्च २0१९ पर्यंत अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याचे दिलीप ठक्कर यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका माधुरी भोईर उपस्थित होते.