Join us  

चारकोपच्या म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल, घरच्या गळतीमुळे लागली चिंता

By मनोहर कुंभेजकर | Published: April 28, 2023 6:24 PM

म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल होत असून घरच्या गळतीमुळे त्यांना चिंता लागली आहे.

मुंबई - आयुष्याची पुंजी टाकून, कर्ज काढून मुंबईकरम्हाडाच्या लॉटरीचा सोपस्कार पूर्ण करत आणि लॉटरी लागल्यावर आनंदाने म्हाडाच्या घरात राहायला येतात. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येते. सायन प्रतिक्षा नगर इमारतीला तडे गेल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेवून राहत आहेत तर दुसरीकडे तर २०१७ च्या लॉटरीत सदनिका लागलेल्या चारकोपच्या पॅगोडा व्ह्यू को. ओ. हौ. सोसायटीत ४ विंग असून येथे २१६ फ्लॅट्स आहेत. येथील म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल होत असून घरच्या गळतीमुळे त्यांना चिंता लागली आहे.

याप्रकरणी गृहनिर्माण खात्याचा अतिरिक्त कार्यभार संभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बोरीवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे यांनी जातीने लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांदिवली पश्चिम चारकोप भागात मोठ्या प्रमाणात म्हाडा वसाहती आहेत. ९० च्या काळात याठिकाणी म्हाडा लोकांना प्लॉट उपलब्ध करून देत विजेत्यांना विकासक नेमून बांधकाम करण्यास सांगत. मात्र कालांतराने म्हाडाच मोठमोठ्या इमारती बांधून लोकांना घरे उपलब्ध करून देऊ लागली.२०१७ च्या लॉटरीत म्हाडाने याठिकाणी चारकोप, सेक्टर ८ येथील प्लॉट क्रमांक ३ येथे सीबी अँन्ड सन्स या विकासकाला इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी दिली. 

प्लॉट नं ३ वर म्हाडा इमारत बांधून ४-५ वर्षे झाली आहेत. मात्र याठिकाणच्या रहिवाशांना सातत्याने घरात गळतीची समस्या उद्भवत आहे. मागील वर्षी म्हाडाकडून इमारतीच्या बाह्य भागास वॉटरप्रुफिंग करण्यात आले. परंतु आजही अनेक घरात गळतीची समस्या कायम आहे. त्यात संबंधित विकासकाला म्हाडाने लोकांच्या समस्येचं निरसन करण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु विकासक दिवसेंदिवस कामासंदर्भात चालढकल करत आहे. पावसाळ्यात आजही अनेकांच्या घरात लिकेजची समस्या उद्भवते. रहिवाशांनी याबाबत म्हाडाकडे पाठपुरावा केला त्यानंतर म्हाडाने विकासकाला काम करण्याची सूचना दिली. विकासकाकडून कामाबाबत होणाऱ्या विलंबतेमुळे यंदाही पावसाळ्यात लिकेजची समस्या उद्भवण्याच्या चिंतेने रहिवाशी चिंताग्रस्त आहेत, अशी प्रतिक्रिया पॅगोडा व्ह्यू को. ओ. हौ. सोसायटी माजी सचिव मंगेश यादव यांनी दिली.गळतीच्या समस्येमुळे इमारतीचं आयुष्य धोक्यातसर्वसामान्यांना माफक दरात घरे देण्यासाठी म्हाडा दरवर्षी लॉटरी काढते. या लॉटरीत कमी किंमतीत विजेत्यांना घरे मिळतात. परंतु प्रत्यक्षात म्हाडा इमारतीच्या कामाचा दर्जा पाहिला तर माफक दराच्या नावाखाली सर्वसामान्यांची केलेली ही लूटच म्हणावी लागेल. गळतीच्या समस्येमुळे इमारतीचे आयुष्यही धोक्यात येते. आज चारकोप येथील प्लॉट ३ मधील म्हाडा रहिवाशांना याचाच त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडाने चार भिंतीचे घर दिले परंतु त्यात घरच्या भिंतीला होणारी गळती हे रहिवाशांसाठी आर्थिक नुकसानीचं कारण ठरत आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी म्हाडाने ही काम पूर्ण करून द्यावीत अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.आपल्याशी मागे या सोसायटीने संपर्क साधल्यावर आपण लगेच म्हाडाशी पत्रव्यवहार केला.येथील नागरिकांची सदर समस्या रास्त असून आपण म्हाडाशी याबाबत पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील राणे यांनी दिली.याबाबत म्हाडा बोरिवली विभागाला दुरुस्ती करण्या संदर्भात कळवले असून हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

टॅग्स :म्हाडामुंबई