मुंबई : म्हाडाच्या किंवा खासगी इमारतींचा विकास करताना विकासकाने म्हाडाच्या गाळ्यांची मागणी करून रहिवाशांची सोय केली, मात्र यापोटी विकासकाकडून म्हाडाला भाडे म्हणून देणे असलेली रक्कम अद्याप भरली नसल्याने अशा चाळीसपेक्षा जास्त विकासकांकडे सुमारे १३७ कोटींपेक्षा जास्त भाडे थकीत आहे. हे थकलेले भाडे वसूल करण्यासाठी आता म्हाडाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईमध्ये जागांच्या किमती आणि घरांचे भाडे पाहता खाजगी विकासक इमारतींचा पुनर्विकास करताना रहिवाशांची तात्पुरती सोय व्हावी यासाठी म्हाडाचे गाळे भाड्याने घेत असे. म्हाडाच्या अशा गाळ्यांचे भाडेदेखील अवघे तीन ते सहा हजार रुपये इतकेच आहे. मात्र असे असतानाही विकासकांकडून मागील अनेक वर्षांचे सुमारे १३७ कोटींचे भाडे थकविण्यात आले आहे. या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना आपल्या पुनर्विकसित इमारतीत राहण्यास जागा दिल्यानंतर विकासकांनी त्या ठिकाणी आपल्या कामगार किंवा इतर ठिकाणचे रहिवासी यांना गाळे भाड्याने दिले. यावर म्हाडाने अनेकदा अशा विकासकांना गाळे ताब्यात देण्यासाठी तसेच भाडे भरण्यासाठी स्मरणपत्रेदेखील पाठवली. यापैकी अनेक विकासकांनी गाळे आणि थकीत भाडे देण्याची तयारीही दाखवली; तर काहींनी यावर कसलेच उत्तर दिले नाही. परिणामी, अशा विकासकांकडून भाडे वसूल करण्यासाठी आता म्हाडा न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
थकबाकी वसुलीसाठी म्हाडाची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:38 AM