म्हाडा उभारणार मुंबईत चार वसतिगृहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:06 AM2021-04-03T04:06:30+5:302021-04-03T04:06:30+5:30

मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत विद्यार्थ्यांसाठी चार वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. यापैकी जिजामाता नगर, काळा चौकी येथे पहिल्या वसतिगृहाचे ...

MHADA to set up four hostels in Mumbai | म्हाडा उभारणार मुंबईत चार वसतिगृहे

म्हाडा उभारणार मुंबईत चार वसतिगृहे

Next

मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत विद्यार्थ्यांसाठी चार वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. यापैकी जिजामाता नगर, काळा चौकी येथे पहिल्या वसतिगृहाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली.

कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाने अलीकडेच टाटा रुग्णालयाला शंभर सदनिका दिल्या होत्या. त्यानंतर आता मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाने आगामी काळात चार वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या माध्यमातून १ हजार गरजू विद्यार्थ्यांची सोय विविध वसतिगृहात करण्याचा म्हाडाचा मानस असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच जिजामाता नगर, काळा चौकी येथे पहिले वसतिगृह उभारण्यात येणार आहे. साधारण १,७८५ चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. येथील बांधकामाच्या ७० टक्के जागेत विद्यार्थ्यांसाठी रूम तयार करण्यात येणार आहे. येथे १५० चौरस फुटाचे सुमारे २२० रूम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचेही आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

* ...तर विकासकाचा करार रद्द

मुंबई आणि ठाण्यातील म्हाडा काॅलनीतील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. अनेक ठिकाणी विकासकांनी रहिवाशांसोबत करार केले आहेत. मात्र, या करारनाम्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना मात्र सुरुवात झालेली नाही. उलट विकासकांकडून मुजोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे विकासकांना पाच वर्षांपेक्षा अधिक काळ इमारतीचा पुनर्विकास रोखून ठेवता येणार नाही. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काम रोखून ठेवले तर म्हाडा स्वतःच त्या इमारती विकसित करेल. तसेच संबंधित विकासकाचे करार रद्द समजण्यात येतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: MHADA to set up four hostels in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.